पतीचे कर्ज फेडण्याच्या बहाण्याने महिलेला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार..
झारखंड : महिलांवर अत्याचार, अन्यायाच्या घटना दुर्दैवाने प्रत्येक शहरात होत आहेत. अशीच एक घटना कर्जाच्या रक्कमेची परतफेड करायची असल्याचे सांगून युवतीला घरी नेण्याच्या बहाण्याने एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर बलात्कार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील गढवा जिल्ह्यातुन समोर आली आहे.
पीडित महिला बिहारमधली, पाटण्यातली आहे. याप्रकरणी जहिरुद्दीन अन्सारी याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जहिरुद्दीन आणि पीडित युवतीचा पती गुजरात इथे एकाच कंपनीत काम करत होते. या युवतीच्या पतीने जहिरुद्दीनला ४५ हजार रुपये कर्जाऊ दिले होते. जहिरुद्दीनने कर्ज घेतल्यानंतर तो गढवात परत आला होता. कर्जाची रक्कम परत करायची आहे, असं सांगून त्याने पीडित युवतीला बोलावून घेतले. ही युवती पाटण्याहून बन्सीधरनगरला ट्रेनने गेली होती.
तिथं पोहोचल्यानंतर जहिरुद्दीनने तिला फोन केला आणि तो त्याच्या घरी पैसे देईल, असे युवतीला सांगितले. तिला घरी नेण्याच्या बहाण्यानं बेल पहाडी परिसरात त्याने युवतीवर बलात्कार केला आणि तिथंच तिच्या हत्येचा प्रयत्नदेखील केला; मात्र या पीडित युवतीने धाडसानं स्वतःचा बचाव केला. धैर्य दाखवून १०० क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली.
दरम्यान, पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी पीडितेला उपचारासाठी बन्सीधरनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.