हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडच चालवत होता सगळी यंत्रणा!! देशमुखांना हत्येआधी धमकीही दिली होती, आज एसआयटीकडून सगळंच उघड झालं…

बीड : येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर काल मोक्का लावण्यात आला. यानंतर काल परळीत कराडच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार राडा करत परळी बंदची हाक दिली आहे.

त्यानंतर बुधवारी त्याला पुन्हा बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. या घटनेबाबत एसआयटीने न्यायालयात महत्त्वाची माहिती दिली. ज्या दिवशी हत्या झाली त्याच दिवशी कराडने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती.
आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि त्यांची हत्या केली. कराडचे सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यात संभाषण झाले होते, असा दावा एसआयटीकडून न्यायालयात करण्यात आला. दरम्यान, कराडवर मोका का लावला? यासाठी त्याच्यावरील गुन्ह्यांची यादी पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आली आहे.

वाल्मीक कराड यांचे संभाषण आणि संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ मिळतीजुळती आहे, असे सांगत एसआयटीकडून वाल्मीक कराडची १० दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली. तपासदरम्यान मिळालेल्या पुराव्यांची शहानिशा करायची आहे.
तसेच विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. तसेच संशयित आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्याचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी कराड याची कोठडी हवी असल्याचा दावा एसआयटीने केला. वाल्मीक कराडची देश-विदेशात मालमत्ता आहे का? याचा शोध घ्यायचा असल्याचे एसआयटीकडून सांगण्यात आले.
आरोपींनी कोणी मदत केली?
कृष्णा आंधळे फरार असून त्याला लपवण्यासाठी आरोपींनी मदत केली का? याचा तपास करायचा आहे. घुले, चाटे फरार असताना त्यांना कोणी मदत केली? याचाही तपास करायचा असल्याचा युक्तिवाद एसआयटीच्या बाजूने करण्यात आला.
वाल्मीक कराडची अटक बेकायदेशीर- कराडच्या वकिलाचा दावा
तर वाल्मीक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी, कोणत्याही आरोपीने कराडचे नाव घेतले नसल्याचा दावा केला. वाल्मीक कराडाची अटक बेकायदेशीर आहे. कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही. कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही, असाही त्यांनी युक्तिवाद केला.
दरम्यान, एखाद्याला फोन कॉल केला म्हणजे आरोपी होऊ शकतो का? खंडणी आणि खून प्रकरणात आरोपी कसे काय केले? या एकाच प्रश्नावर दोन्ही बाजूने २५ मिनिट युक्तिवाद झाला.