इंस्टावर ओळख,शिक्षण अर्धवट सोडून प्रेमाचे चाळे, लग्नाचं अमिष दाखवून अत्याचार अन गरोदर राहताच….

उरण : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून होणारी मैत्री आणि त्यानंतर मैत्रीतून होणाऱ्या प्रेमातून फसवणूक. या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत असतानाच उरणमध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने इन्स्टाग्रामवरून रसायनी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर अल्पवयीन मुलाने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी आणि आरोपी या दोघांची जानेवारी 2024 मध्ये instagram वर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केला अन पीडित मुलगी गरोदर राहिली. मात्र त्यानंतर मुलाने लग्न करण्यास नकार दिला.पीडित मुलगी रसायनी येथील आपल्या आई वडिलांच्या घरी गेल्यानंतर तिने रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
पीडित मुलीच्या आई वडिलांना काही महिन्यांपूर्वी याबाबतची माहिती समजल्यानंतर त्यांनी उरण येथील अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यावेळी अल्पवयीन मुलाने पीडित मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पीडितेच्या आई वडिलांनी मुलीचे वय पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न मुलासोबत लावून देण्याची तयारी दर्शवली होती. तसेच तोपर्यंत पीडित मुलीला अल्पवयीन मुलाच्या घरी ठेवले होते. मात्र त्यानंतर अल्पवयीन मुलाने व त्याच्या कुटुंबीयांनी पीडित मुलीसोबत लग्न करण्यास नकार देऊन तिला घरातून हाकलून दिले.

दरम्यान या प्रकरणी अल्पवयीन मुलाविरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी तसेच पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी उरण पोलिसांकडे वर्ग केला. उरण पोलिस या प्रकरणातील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे