रेशनवर आता गव्हाऐवजी ज्वारी मिळणार, पहिल्यांदाच मिळालेल्या ज्वारीत सगळा फुफाटा, जाणून घ्या….

गेवराई : सरकारच्या वतीने स्वस्त धान्य दुकानातून कार्डधारक यांना मोफत तांदूळ अन् गहू देण्यात येत होता. असे असताना या फेब्रुवारी महिन्यापासून आता गव्हाऐवजी ज्वारी वाटप करण्याचा निर्णय शासनाच्या पुरवठा विभागाने घेतला आहे. गेवराई तालुक्यातील शहरातील व ग्रामीण भागातील गावखेड्यातील स्वस्त धान्य दुकानात ज्वारीचा पुरवठा करण्यात आला आहे.

फेब्रुवारीपासून गेवराईतील २५७ स्वस्त धान्य दुकानातून गव्हाऐवची ज्वारीचे वाटप करण्यात येत आहे. वाटप होत असलेल्या ज्वारीत फुफाटा अन् पिठ व किडे व किडकी ज्वारी वाटप होत असलेल्या तक्रारी रेशन धारकांकडून होत आहे. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही कार्डधारक ज्वारी ऐवजी तांदूळच द्या, अशी मागणी दुकानदार यांच्याकडे करत आहेत. साहेब फुफाटा असलेल्या ज्वारीची भाकरी खायची तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्वारी ही निकृष्ट असल्याच्या तक्रारी शिधापत्रक लाभधारकांतून होत आहेत.

या ज्वारीत फुफाटा, किडे अन् किडकी असल्याने भाकरी खायची तरी कशी? अशा प्रतिक्रिया गेवराईच्या ग्रामीण भागातील गावखेड्यातील रेशन धारकांत व्यक्त होत आहेत. सदरील ज्वारी खाण्यायोग्य नसल्याने चांगल्या प्रतीची खाण्यायोग्य ज्वारीचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
येणाऱ्या काळात राज्यात इतर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर ज्वारीचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे इतर ठिकाणी तरी चांगल्या प्रतीची ज्वारी मिळणार का हे लवकरच समजणार आहे.