आता आठवड्यात 4 दिवस काम अन् 3 दिवस सुट्टी मिळणार?सरकारनेच दिले मोठे संकेत

पुणे :भारतातील बड्या शहरात, दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, चैन्नई, कोलकत्ता येथे 5 दिवसांचा आठवडा आहे. येथे शनिवार आणि रविवारी सुट्टी असते.गेल्या काही वर्षांपासून चार दिवस कामाचे, तीन दिवस सुट्ट्यांचे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती.आता त्यानुसार भारतात नवीन कामगार संहिता लागू करण्यात आली आहे.त्यात चार दिवस कामाचे आणि तीन दिवस सुट्टीचे धोरण राबविण्याबाबत मोठे संकेत देण्यात आले आहेत.
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया X या हँडलवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मंत्रालयाने चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी अशा आठवड्याला संमती दिल्याचे दिसून आले. मंत्रालयाने नवीन कामगार संहितेत एका आठवड्यात जास्तीत जास्त 48 तासांच्या कामाची मर्यादा निश्चित केली आहे. हे अगोदरचेच धोरण लागू असल्याचे जाहीर केले आहे. त्यासोबतच मंत्रालयाने 4 दिवसांचा कामाचा आठवडा शक्य असल्याचे म्हटले आहे.
मात्र सरकारने केलेल्या या धोरणासाठी काही अटी आणि शर्ती पाळाव्या लागतील. नवीन सुधारीत कामगार संहितेत चार दिवसांच्या कामासाठी 12 तासांच्या कामाची मर्यादा देण्यात आली आहे. त्यामुळे इतर तीन दिवस सुट्ट्या लागू होतील. त्यासाठी कर्मचाऱ्याला एका दिवसात 12 तासांची शिफ्ट करावी लागणार आहे. ज्या आस्थापनेतील कर्मचारी यासाठी तयार असतील तिथे चार दिवस काम आणि इतर तीन दिवस सुट्यांचा आठवडा हे धोरण लागू करण्यास कायदेशीर अडथळा येणार नाही.

दरम्यान कामगार आणि रोजगार मंत्रालयानुसार, 12 तासांच्या पाळीत कर्मचाऱ्यांना मध्यंतर म्हणजे ब्रेक द्यावा लागेल. त्यामुळे शिफ्टनुसार कामगारांना ब्रेक द्यावा लागणार आहे. जर चार दिवसांचा आठवडा लागू झाला आणि कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम काम केले तर पगार वाढले का, असा सवाल मंत्रालयाला विचारण्यात आला होता.

त्यावर मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, आठवड्यात 48 दिवसांच्या कामाची मर्यादा आहे. त्यापेक्षा अधिक काम करुन घेतल्यास सहाजिकच कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईमचा, अधिक कामाचे दुप्पट पैसे मोजावे लागतील.
