काय दिवस आलेत, एकेकाळी फेकून दिले आता होतेय पुण्यात चक्क टोमॅटोची चोरी, शेतकऱ्यासोबत नेमकं काय घडलं?

पुणे : शिरूर तालुक्यातील पिंपरी खेड येथील एका शेतकऱ्याचे विक्रीला नेण्यासाठी तोडून ठेवलेले टोमॅटोचे २० कॅरेट चक्क चोरांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अरुण बाळू ढोमे असे टोमॅटो चोरी झालेल्या शेतकऱ्याचे नाव.
शिरूर तालुक्यातील पिंपरी खेड येथील शेतकरी अरुण बाळू ढोमे यांनी टोमॅटो तोडून विकण्यासाठी कॅरेटमध्ये ठेवले होते. अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेले. या प्रकरणी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ढोमे यांनी मोठ्या हिमतीने टोमॅटो पिकाची लागवड केली होती. त्यानंतर त्यांनी तोडणीलादेखील पैसे लावले. त्यानंतर त्यांनी बाजारात विकण्यासाठी नेण्यासाठी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ढोमे हे गाडी आणि कॅरेट व्यवस्थितरित्या लावल्याची खात्री करून झोपले होते.
मात्र दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर गाडीत टोमॅटो भरलेले कॅरेट गायब झाले होते. हे पाहून त्यांना धक्का बसला. या प्रकाराची त्यांनी पोलीस पाटलांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आणि घटनेचा तपास करण्याची मागणी केली आहे.