शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी!! आता राज्यातील पाऊस घेणार ब्रेक, हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती…

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सक्रीय असणारा पाऊस ब्रेक घेणार आहेत. राज्यातील काही भागांत तुरळक ते मध्यम पाऊस पडणार आहे. परंतु संपूर्ण राज्यातून मोठा पाऊस ब्रेक घेणार आहे. तसेच १७ जुलैपर्यंत राज्यात मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २० जुलैपासून पुन्हा पावसाचे नवीन चक्र सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पावसासाठी प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनी काही काळ संयम ठेवावा लागणार आहे.
तसेच राज्यात सध्या तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांत सुरू असला, तरी मोठ्या प्रमाणावर पावसाने उघडीप घेतली आहे. विशेषतः कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात जिथे गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाची नोंद झाली होती, तिथेही आता वातावरण थोडं निवळलेलं आहे.

हवामान विभागाने कुठल्याही भागासाठी रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी केलेला नाही. अरबी समुद्रातून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांमध्ये सध्या कमकुवतपणा जाणवत आहे. या वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर कमी झाला आहे. तसेच मान्सूनच्या पश्चिम टोकाची स्थितीही थोडीशी उत्तरेकडे सरकली आहे. त्यामुळे पावसाच्या नियमिततेवर परिणाम झाला आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात हवेचा दाब अनुकूल होण्याची शक्यता जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून व्यक्त करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे 20 जुलैपासून राज्यात पुन्हा जोरदार पावसाचे आगमन होईल, असा अंदाज आहे.