आता रिंगरोडमधील बाधित गावांचे होणार फेरमूल्यांकन, २० जुलैपर्यंत मुदत..
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंग रोडसाठी पश्चिम मार्गावरील ३२ गावांचे, तर पूर्वेकडील ४८ गावांपैकी ४ गावांची दरनिश्चिती झाली आहे. उर्वरित गावांचे अंतिम दरनिश्चिती २० जुलैपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
पश्चिम आणि पूर्व भागातील फेरमूल्यांकन केले आहे. पश्चिम भागातील बाधित होणाऱ्या मावळ, मुळशी, भोर आणि हवेली तालुक्यातील ३२ गावांतील ६९७ हेक्टर क्षेत्रातील दोन हजार ४०४ स्थानिक बाधित होणार आहे, तर पूर्वेकडील भोर तालुक्यातील ४ गावांतील १०५ हेक्टर क्षेत्रातील १७७ स्थानिक बाधित होत आहेत.
या स्थानिकांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया आठवडाभरात सुरू करण्यात येईल. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून १७२ किलोमीटर आणि ११० मीटर रुंदीचा हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग केले आहेत.
पूर्व मार्गातील मावळ तालुक्यातून ११, खेड १२, हवेली १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांतून प्रस्तावित आहे, तर पश्चिम मार्गावरील भोरमधील ५, हवेली ११, मुळशी १५ आणि मावळ तालुक्यातून सहा गावे बाधित होणार आहे. प्रकल्पासाठी २६ हजार ८०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
गेल्या तीन वर्षांतील व्यवहार गृहीत
जमिनींचे मूल्यांकन करताना गेल्या तीन वर्षांतील खरेदी-विक्रीचे व्यवहार गृहीत धरून करण्यात आले. कोरोना काळात रिंगरोड जाणाऱ्या बहुतांशी गावांत खरेदी-विक्रीचे व्यवहार अत्यल्प झाले.
परिणामी प्रकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनींचा दर कमी होत असल्याचा आक्षेप स्थानिकांनी घेतला. त्यामुळे पाच वर्षांतील खरेदी-विक्री व्यवहार गृहीत धरून मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पश्चिम आणि पूर्व भागातील सर्व बाधित गावांच्या फेरमूल्यांकनाची पूर्ण प्रक्रिया राबविण्यात आल्याने प्रकल्पाला विलंब झाला आहे.