आता तांदूळ बंद अन् मिळणार ‘हे’ खास धान्य, रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती आली समोर…


पुणे : राज्य शासनाच्या शिधा वितरण व्यवस्थेत महत्त्वाचा बदल जाहीर करण्यात आला असून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनांमधील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्य वितरण पद्धतीत सुधारणा करत मार्चपासून तांदळाच्या ऐवजी मक्याचा समावेश करण्यात येणार आहे.

या निर्णयाचा परिणाम जिल्ह्यातील लाखो रेशनकार्डधारक कुटुंबांवर होणार आहे. हा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासन व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत केली जात आहे. जिल्ह्यातील अंत्योदय योजनेतील ८७,०६४ रेशनकार्डधारक (३,८६,०३४ लाभार्थी) आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील ६,३७,११४ रेशनकार्डधारक (२५,६३,९७१ लाभार्थी) यांना या बदलाचा लाभ मिळणार आहे.

मार्चपासून तांदळाऐवजी मका वितरित केला जाणार आहे. अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा १० किलो मका आणि ११ किलो गहू मिळेल. प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी २ किलो गहू आणि १ किलो मका देण्यात येणार आहे. हा बदल सुरुवातीला तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे.

शासनाच्या मते, साठा व्यवस्थापन अधिक परिणामकारक करणे, स्थानिक पातळीवर उपलब्ध धान्याचा वापर वाढवणे आणि वितरण साखळी संतुलित ठेवणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. तांदळाच्या साठ्याऐवजी उपलब्ध मक्याचा वापर करून पर्यायी धान्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत थेट खरेदी करून मका रेशन दुकानांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.

दरम्यान, काही लाभार्थ्यांमध्ये या बदलाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः शहरी भागातील कुटुंबांना मक्याचा स्वयंपाकात वापर कसा करायचा याविषयी प्रश्न पडले आहेत. ग्रामीण भागात मक्यापासून भाकरी किंवा इतर पदार्थ बनवण्याची पद्धत रूढ असली, तरी शहरांमध्ये मार्गदर्शनाची गरज भासू शकते. पुढील तीन महिन्यांत या नव्या प्रयोगाचे परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!