पुणेकरांची वाहतूक कोंडीची कटकट कायमची मिटणार! आता पुणे महापालिकेने घेतला मोठा निर्णय…

पुणे : पुणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी वाहनसंख्या यामुळे अनेक महत्त्वाच्या मार्गांवर सातत्याने कोंडी निर्माण होत आहे. विशेषत: चांदणी चौक ते भूगाव मार्गावर सकाळ-संध्याकाळी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात.

तसेच या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 203 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, एस्टिमेट समितीने याला तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आवश्यक असलेल्या भूसंपादनापैकी 80% जमीन ताब्यात आल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. चांदणी चौकातून भूगावच्या दिशेने दोन किलोमीटरपर्यंतचा रस्ता महापालिकेच्या हद्दीत येतो.

मुळशी, कोकण, पिरंगुट औद्योगिक वसाहत तसेच भूगाव–भुकूम परिसरातील मोठी वाहतूक ह्याच मार्गाने जाते. रस्त्याचे पूर्वी रुंदीकरण झाले असले तरी वाढत्या वाहनदाबामुळे तो आता अपुरा ठरत आहे.
भूगाव–भुकूम परिसर गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित होत असून, सध्याची सुमारे 1 लाख लोकसंख्या काही वर्षांत 3 लाखांपर्यंत वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. लोकसंख्या वाढेल तसे वाहतूक दाब प्रचंड प्रमाणात वाढणार असून भविष्यात गंभीर कोंडीची शक्यता आहे. या परिस्थितीत नागरिकांना मोठा दिलासा मिळावा म्हणून महापालिकेने उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरचा निर्णय घेतल्याचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी सांगितले.
महापालिकेच्या डीपी आराखड्यात हा रस्ता 60 मीटर रुंदीचा दर्शवण्यात आला आहे. भूगावच्या पुढे पीएमआरडीएचा प्रस्तावित रिंग रोड आणि राष्ट्रीय महामार्गाशी होणारे कनेक्शन या मार्गाचे महत्त्व अजून वाढवते. त्यामुळे या संपूर्ण रस्त्याचे सुयोग्य रुंदीकरण आणि कोंडीवर स्थायी उपाय म्हणून या संरचनांची उभारणी आवश्यक ठरली आहे.
दरम्यान, या प्रकल्पाअंतर्गत 66 ग्रेड सेपरेटर, दोन किलोमीटरचा उड्डाणपूल आणि राम नदीवरील 30 मीटर लांबीचा, 70 मीटर रुंदीचा पूल उभारला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. या सर्व कामांमुळे चांदणी चौक ते भूगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुलभ होणार असून कोंडीवर मोठा दिलासा मिळेल.
