आता वीज बिलाची नो चिंता, फडणवीस सरकारचे जनतेला मोठे गिफ्ट, १०० युनिटच्या आतील ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा…

मुंबई : एकीकडे महावितरणने वीज दर बिलात वाढ केल्याची ओरड होत असतानाच राज्य सरकारने पावसाळी अधिवेशात मोठी घोषणा केली. त्यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. वीज दर कपातीचा मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे.

वीज दर कपात करत १०० युनिटच्या आत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना तब्बल २६ टक्के शुल्क कपात देण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांना आर्थिक सूट मिळणार असून, पुढील काही वर्षांत वीज दर वाढणार नाही, अशी ग्वाहीही सरकारने दिली आहे.

दरम्यान, राज्यात ७० टक्के ग्राहकांचा वीज वापर १०० युनिटपेक्षा कमी आहे, त्यामुळे या निर्णयाचा थेट लाभ २ कोटींपेक्षा अधिक घरांपर्यंत पोहोचणार आहे. वीज बिलांमधील वाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी वीज दरवाढीविषयी सवाल उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० युनिटच्या आत वापर करणाऱ्या ग्राहकांना २६ टक्के टेरिफ कपातीची घोषणा केली. तसेच, इतर ग्राहक वर्गांनाही वीज दरात सवलतीचा लाभ देण्यात येईल असेही स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या चुकीच्या आदेशांची माहिती देत, त्यात सुधारणा केली जात असल्याचेही नमूद केले. वीज बिल आकारणीतील त्रुटी, उद्योगांसाठी अतीसवलतीचे धोरण, आणि घरगुती ग्राहकांवरील भार यावर त्यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली आहे.
