आता कोल्हापुरी चप्पलसाठी मिळाला ‘QR कोड..


कोल्हापूर : ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी झाला असून, कोल्हापुरी चपलेस ‘क्यूआर कोड’ मिळाला आहे. चपलेच्या आत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एक छोटी चीप बसविण्यात आली असून ही चप्पल मोबाईलने स्कॅन करताच ही कुठे बनवली, कोणत्या कारागिराने बनवली, याची माहिती उपलब्ध होणार आहे.

आता बनावट कोल्हापुरी चप्पल बनविणाऱ्यांवर आणि या बनावट चपलांच्या विक्रीवरही चाप बसणार आहे. बाजारात बनावट कोल्हापुरी चपलांचा सुळसुळाट वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने (लिडकॉम) नवा प्रयोग राबवत कोल्हापुरी चपलांना ‘क्यू आर’ कोड दिला आहे.

कोल्हापुरी चपलेला लागणारे चामडे कुठून आणले, ते कोणत्या प्राण्याचे आहे, आदी सर्व गोष्टींची माहिती ग्राहकांना मिळते. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये वस्तूच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यत प्रत्येक गोष्टीची माहिती असते. हा प्रयोग महाराष्ट्रात नाशिक येथील सह्याद्री फार्म येथील विविध प्रकारच्या फळभाज्यांबरोबरच कापूस आणि रबरच्या विक्रीमध्ये केला गेला आहे.

यात शेतक-यांचे नाव, पिकाचे नाव, शेतक-यांकडून किती रुपयांना विकत घेतले, ग्राहकांना किती रुपयांना विकणार, याची इत्थंभूत माहिती या चीपमध्ये असते. तसेच या तंत्रज्ञानाचा वापर दूध भेसळीला आळा घालण्यासाठी करण्यात आला आहे.

ग्राहकाचे नाव चीपमध्ये समाविष्ट
विशेष म्हणजे चप्पल विकत घेतल्यानंतर संगणकाच्या आधारे संबंधित ग्राहकाचे नावही त्या चीपमध्ये समाविष्ट केले जात आहे. या माहितीमध्ये कोणालाही फेरबदल करता येत नाही. कोल्हापूरसह सीमाभागात बेळगाव, कर्नाटकातून बोगस कोल्हापुरी चपला विक्रीसाठी येत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोल्हापुरी चपलेला चीप लावण्यात येणार आहे, त्यामुळे अशा प्रकाराला आळा बसेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!