आता गणेशोत्सव होणार दणक्यात साजरा! गणेशमूर्तीच्या उंचीवरील नियम राज्य सरकारने हटवले…

पुणे : सध्या गणेशोत्सव जवळ आला आहे. यामुळे सर्वजण याच्या तयारीला लागले आहेत. मंडळे देखील याची तयारी आतापासूनच करत आहेत.
आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होत नाही, तोपर्यंत पीओपीच्या मूर्ती असाव्यात, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने बुधवारी मुंबई महापालिकेकडे केली आहे.
तसेच गणेशमूर्तींच्या उंचीवरील मर्यादा काढून टाकण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. याबाबतचे वाद दरवर्षी सुरू होतात. यामुळे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पीओपी मूर्ती व त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रंगातील विषारी घटक यामुळे पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जाते आहे. मात्र याला अजूनही ठोस पर्याय पुढे आला नाही.
या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. मात्र गणेशोत्सव मंडळांना येणाऱ्या अडचणी व त्याची संयुक्तिक कारणे राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीत मंडळांनी मांडले.
पीओपीमधील घातक घटक बाजूला करून मूर्ती कशा तयार करता येतील, याबाबत शास्त्रज्ञांची समिती नियुक्ती केली जाईल. या समितीचा अहवाल येईपर्यंत व पीओपीला सक्षम पर्याय मिळत नाही, तोपर्यंत गतवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती पीओपीच्या राहतील.
तसेच, मूर्तींच्या उंचीची मर्यादाही काढून टाकावी, या मंडळांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत मान्यता दिली आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड नरेश दहिबावकर यांनी दिली.