राज्य सरकारची लाडकी बहीण योजनेत आता वर्षाला ३ घरगुती गॅस सिलेंडर मोफतचा निर्णयही जारी, जाणून घ्या…
मुंबई : राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केल्याने याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या महिला भगिनींना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्यासोबतच आता वर्षाला ३ घरगुती गॅस सिलेंडर देखील मोफत देण्यात येणार आहेत. यामुळे याचा फायदा होणार आहे.
याबाबत मंत्री छगन भुजबळ यांच्या अन्न व नागरीपुरवठा विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून याबाबत योजना सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. याबाबत आज शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
राज्यातील गोरगरीब कुटुंबांना याचा फायदा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करुन स्त्री सक्षमीकरण करणे, या उद्देशाने उज्ज्वला योजना सन-२०१६ मध्ये सुरु करण्यात आली.
दरम्यान, या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅसजोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरु आहे. आता याचा निवडणुकीत किती फायदा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याबाबत लवकर निर्णय घेण्यात येत आहेत.