कुख्यात गुंड निलेश घायवळला मोठा धक्का ; पुणे पोलिसांनी ईडीकडून लावला ट्रॅप, काळे कारनामे समोर…

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर खून आणि खुनाच्या प्रयत्नासह अधिक गुन्हे दाखल असुन या गुन्ह्याच्या आधारावर घायवळने मोठी आणि संशयास्पद संपत्ती जमा केली असावी, असा पोलिसांना दाट संशय आहे. यास पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ईडीकडून ट्रॅप लावला असून तपासातून मोठा मनी लॉड्रिंगचा प्रकार उघडकीस येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे निलेश घायवळला मोठा धक्का बसणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,पुणे पोलिसांनी टोळीप्रमुख नीलेश घायवळ याच्या संशयास्पद आर्थिक उलाढालींचा तपास करण्यासाठी अंमलजावणी संचालनालयाला म्हणजेच ईडीला पत्र पाठवून औपचारिक विनंती केली आहे. पोलिसांनी घायवळच्या सर्व गुन्ह्यांसंदर्भातील एफआयआर आणि आवश्यक पुरावे ईडीकडे सोपवले आहेत. यामुळे या प्रकरणाच्या तपासातून मोठा मनी लॉड्रिंगचा प्रकार उघडकीस येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या घायवळने बेकायदेशीर मार्गाने पासपोर्ट मिळवल्याचेही समोर आले असून, तो सध्या परदेशात असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खंडणी, खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे तसेच मालमत्ता बळकावण्यासाठी दुखापत पोहोचवणे अशा अनेक गंभीर आरोपांचा समावेश आहे. तपासादरम्यान पोलिसांना घायवळच्या प्रचंड मोठ्या आर्थिक उलाढालीचे ठोस पुरावे हाती लागले आहेत. या टोळीने धाराशिव, अहिल्यानगर, बीड आणि सातारा यांसारख्या परिसरांमध्ये विंड पॉवर प्रकल्पांशी संबंधित गैरव्यवहार, खंडणी आणि इतर बेकायदेशीर मार्गांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे यातून आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
