एअर इंडियाचं विमान नव्हे तर आगीचा गोळा, २ सेकंदात विमानाचा स्फोट, अपघाताचे हादरवून टाकणारे व्हिडीओ समोर..

अहमदाबाद : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. हा देशातील सर्वात मोठा विमान अपघात असल्याचे सांगितले जात आहे. मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळलं असून रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून, तो अत्यंत भयावह आहे. विमान कोसळताच मोठा स्फोट झाला असून, संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. AI171 हे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या गॅटविककडे रवाना होतं.
तसेच यामध्ये एकूण २४२ प्रवासी होते. मात्र उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या दहाच मिनिटांत हे विमान जमिनीवर कोसळलं. मेघाणी नगर या रहिवासी भागात ही दुर्घटना झाली. विमान कोसळल्यानंतर लगेचच त्याने पेट घेतला.

VIDEO: एअर इंडिया विमानाला अहमदाबादमध्ये जो भीषण अपघात झाला त्याचा हादरवून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे pic.twitter.com/iM14UVCpAT
— Rohit Gole (@RohitGole2) June 12, 2025
घटनेचा सीसीटीव्ही व मोबाईल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विमान झपाट्याने खाली येताना दिसते आणि काही सेकंदात भीषण स्फोट होतो. परिसरात लोकांची धावपळ सुरू होते. घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांचे पथक तातडीने दाखल झाले आहे.
दरम्यान, सध्या दुर्घटनाग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अनेकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप अधिकृत मृत्यूची संख्या स्पष्ट झालेली नाही, मात्र मोठ्या जीवितहानीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संवाद साधून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. घटनास्थळी NDRF पथक पाठवण्यात आले असून, केंद्र सरकारकडून संपूर्ण मदत केली जात आहे.