माढा वरून निर्माण झाला तिढा! रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी मोहिते पाटील घराण्याला पसंत नाही?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच भाजपाने पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकर यांना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपातील मोठा गट नाराज झाला आहे. पुढील २-३ दिवसात माढ्यात राजकीय धमाका होण्याचीही शक्यता आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
भाजपाकडून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली पण या उमेदवारीला विरोध करणा-या मोहिते-पाटील घराण्यातील नेत्यांनी अद्याप शांत राहणे पसंत केले. अद्याप मोहिते पाटील घराण्याने त्यांची भूमिका जाहीर केली नसली तरी त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर लावा ताकद.. आता माढा लोकसभा आपलीच अशी मोहीम सुरू केली आहे.
माढा मतदारसंघात भाजपाकडून खासदार रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशील मोहिते-पाटील यांची नावे चर्चेत होती. खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते-पाटील यांनी विरोध केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यातील वाद मिटविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती.
या बैठकीनंतर दोघांमधील वाद शमतील असे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी म्हटले होते. खासदार निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते- पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी निंबाळकर यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे.