लॉकडाऊन नाहीच; अफवा पसरवल्यास होणार कठोर कारवाई; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा…

मुंबई : अमेरिका–इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर होत असून, जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. या तणावामुळे कच्च्या तेलासह नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, मध्यपूर्वेतील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे.

या अफवांमुळे बाजारपेठांमध्ये तसेच शहरांतील छोट्या व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य लॉकडाऊनच्या चर्चेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये अनिश्चितता वाढत असून, भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देत, राज्यात कोणताही लॉकडाऊन लागू करण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच सोशल मीडियावर लॉकडाऊनसंदर्भात खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर १० रुपयांची कपात केली असून, वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीचा अतिरिक्त भार आता तेल कंपन्यांवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना महाग दराने इंधन खरेदी करण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की, भारताच्या शेजारील काही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असली तरी भारतात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लावू नयेत. देशात सुमारे एका महिन्याचा पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आखाती संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या या मोठ्या निर्णयानुसार, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १३ रुपयांवरून ३ रुपयांवर आणण्यात आले आहे, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क पूर्णपणे शून्यावर करण्यात आले आहे. इंधन दरवाढीची शक्यता लक्षात घेऊनच ही कपात करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.