चुकीला माफी नाही! राजीनामा द्यायला टाळाटाळ, आता अजित पवार कोकाटेंचा थेट कार्यक्रम करणार, या नेत्याकडे देणार कृषिमंत्रिपद..

मुंबई : विधानपरिषदेत ऑनलाईन रमी खेळत असल्याचा ठपका असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याकडून कृषी खाते काढून घेतील, अशी माहिती आहे.

यामुळे आता अजित पवार नेमका कधी निर्णय घेणार हे लवकरच समजेल. कृषी खात्याचा कारभार अजित पवार वाईचे आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांच्याकडे देणार असल्याचे सांगितले जात आहे. कोकाटे यांचा सभागृहात ऑनलाईन रमी (Rummy) खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रचंड गोंधळ झाला.
यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचे देखील दिसून येत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना नाराजी व्यक्त केली होती. याबाबत अजित पवार अजून काही बोलले नाहीत. पक्षाचा एकही नेता माणिकराव कोकाटे यांच्या बचावासाठी मैदानात उतरला नव्हता.

यामुळे माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी होण्याचे संकेत मिळाले होते. आता अजित पवार यांनाच स्वत:हून कारवाईचा बडगा उगारावा लागणार आहे. माणिकराव कोकाटे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. तत्पूर्वी आदल्या दिवशी माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची फोनवरुन बातचीत झाल्याची चर्चा होती.
यामध्ये माणिकराव कोकाटे हे मंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. पण, माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा किंवा दिलगिरी तर सोडाच पण व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याची भाषा केली होती. यामुळे विरोधक अजूनच आक्रमक झाले. तसेच त्यांनी या पत्रकार परिषदेत ‘शासन भिकारी’ असल्याचा उल्लेख केला.
यामुळे पुन्हा ते अडचणीत आले. कोकाटे हे आज मुंबईत अजित पवार यांची भेट घेण्यासाठी येणार होते. दुपारी तीन वाजता या दोन्ही नेत्यांची बैठक ठरली होती. मात्र, हा दौरा अचानक रद्द झाला होता. अजितदादांनी कोकाटेंना भेट नाकारल्याने आता त्यांची गच्छंती अटळ असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता काय होणार हे लवकरच समजेल.