नाशिकमध्ये तीन महिने ‘नो एन्ट्री’, सर्व खासगी बस थांबे रद्द, नेमकं काय आहे कारण?

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्ती, रुंदीकरण आणि उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. या विकासकामांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात सर्व खासगी बस तसेच जड आणि अवजड वाहनांसाठी ‘नो एन्ट्री’ लागू करण्यात आली आहे.

यामुळे आता नाशिककरांचे हाल होण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांनी नाशिकमध्ये पुढच्या तीन महिन्यांसाठी खासगी बसेस आणि अवजड वाहनांना नो एन्ट्री केलेली आहे. काही ठराविक वेळेसाठी नाशिकमध्ये नो एन्ट्री असणाक आहे.
वाहतूक पोलीस उपायुक्त किरिथिका सी. एम. यांनी या संदर्भातील अधिसूचनेला पुढील तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार शहरातील सर्व खासगी बसथांबे, पिक-अप आणि ड्रॉप पॉइंट्स तसेच पार्किंग स्थळे रद्द करण्यात आली आहेत. मात्र, तपोवन येथील सिटीलिंक बस टर्मिनलवरून प्रवाशांची वाहतूक पूर्ववत सुरू राहणार आहे.

द्वारका सिग्नल ते सारडा सर्कल आणि काठे गल्लीपर्यंत ‘ग्रेड सेप्रेटर’चे काम सुरू आहे. त्यासाठी वाहतूक मार्गात मोठ्या प्रमाणात बदल केले असून, कार व दुचाकी मुंबई नाकामार्गे आणि टाकळीमार्गे मार्गस्थ होत आहेत.
दरम्यान, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला खासगी बसचे सर्व थांबे रद्द करण्यासह शहरात प्रवेशबंदीची अधिसूचना जारी झाली होती. त्यामध्ये वाढ करून ३१ मेपर्यंत अधिसूचना लागू ठेवण्यासंदर्भात आदेश जारी झाले आहेत. शहरातील २९ रस्त्यांची दुरुस्ती, खोदकामाने उद्भवणारी कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय झाला आहे.
‘हे’ आहेत आदेश
शहरात २९ रस्त्यांची व पाच उड्डाणपुलांची विकासकामे, दुरुस्ती, रुंदीकरण सुरू
खासगी ट्रॅव्हल्समुळे द्वारका, मुंबई नाका, रुची हॉटेल, महामार्ग बसस्थानक, ठक्कर बाजार, ट्रॅक्टर हाउस, तिगरानिया रोड, कन्नमवार पूल, रामकुंड परिसरात वाहतूक कोंडी
जड, अवजड वाहने व खासगी बसना सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत शहरात प्रवेश बंद; सकाळी ८ पूर्वी बस व वाहने शहरातून मार्गस्थ होतील
सर्व खासगी बसचे थांबे, पिक-अप आणि ड्रॉप पॉइंट्स, पार्किंग स्थळे रद्द
तपोवन सिटीलिंक बस टर्मिनलच्या जागेत सर्व खासगी बस प्रवासी उतरवतील आणि भरतील, तसेच तेथेच वाहने पार्किंग करतील
२८ फेब्रुवारी ते ३१ मे २०२६ या कालावधीत अधिसूचना लागू; आवश्यकतेनुसार अधिसूचनेत बदल आणि मुदत वाढविण्यात येईल.