पक्षासाठी संयम बाळगला, पण आता…,नगरपरिषदेच्या निकालानंतर नितेश राणेंच्या ‘त्या’ विधानाने राजकारणात खळबळ

पुणे : राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीचा निकाल काल जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या या निवडणुकीत कोकणातील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मालवण नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेची मुसंडी मारली आहे.
विशेषतः कोकणातील निकालानंतर भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या निकालानंतर नितेश राणेंनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या भावना सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो… पण काही गोष्टी बोलल्या नाहीत, तर त्या खऱ्या वाटायला लागतात. आता ती वेळ आली आहे, असे ट्विट नितेश राणेंनी केल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या विधानामागे नेमकं कोण किंवा काय आहे, याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.

दरम्यान, नितेश राणेंचं “आता बोलण्याची वेळ आली आहे” हे विधान केवळ भावनिक नसून, भविष्यातील राजकीय घडामोडींचा संकेत असल्याचं मानलं जात आहे. कोकणातील निकाल, कणकवलीतील सत्तासंघर्ष आणि पक्षांतर्गत समीकरणं यामुळे येत्या काळात नितेश राणेंची भूमिका अधिक आक्रमक होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

