निरा भिमा सहकारी साखर कारखान्याकडून दिवाळीपूर्वी 100 रुपये प्रमाणे ऊस बिलाचा हप्ता मिळणार, भाग्यश्री पाटील यांची माहिती..

इंदापूर : तालुक्यातील महत्वाच्या असणाऱ्या निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन 2024-25 ची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी सांगितले कि, सन 2024-25 च्या हंगामामध्ये गाळप झालेल्या ऊसाला दिवाळीपूर्वी प्रति टन रु. 100 प्रमाणे ऊस बिलाचा हप्ता दि. 10 ऑक्टोबर पूर्वी आपण अदा करणार आहे. तसेच दिवाळी निमित्त कामगारांना एक पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे.
तसेच आगामी गळीत हंगामामध्ये कारखान्याचे 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. नीरा भीमाचा चालु होणारा सन 2025-26 चा गळीत हंगाम हा रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम आहे. कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धनजी पाटील यांचे नेतृत्वाखाली उसाचे 7 लाख मे. टन गाळप व साखर उतारा 11.50 टक्के पूर्ण करण्याचे संचालक मंडळाचे उद्दिष्ट आहे.

तसेच आगामी गळीत हंगामामध्ये उसाचे पेमेंट वेळेवरती होईल, त्यामध्ये कधीच विलंब होणार नाही, याची ग्वाही मी देते तसेच कारखाना ऊस दरात मागे राहणार नाही, अशीही ग्वाही त्यांनी सभासदांना दिली. सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना पैसे वेळेवर देणे देखील गरजेचे आहे. यातून मार्ग काढत पुढे जाऊ असेही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.