निलेश लंके अजित पवार यांना भेटणार , काय झाल्या घडामोडी ..!!
नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या तीन दिवसांत राज्यातील दोन आमदारांच्या मनात दम भरला. यात नगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांचा समावेश आहे. ‘निलेश बेटा, तुझा बंदोबस्तच करतो.’, ‘तू किस झाड की पत्ती है’, असे पारनेर विधानसभा मतदारसंघात येऊन अजितदादांनी फटकारले होते. यावर निलेश लंकेंनी मौन सोडले आहे. ‘अजितदादांना संपर्क करतो. निवडणूक होऊ द्या,’ असे निलेश लंके यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी नगरमध्ये महायुती भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या. कर्जत-जामखेडपाठोपाठ पारनेरमध्येही अजित पवारांची सभा झाली. पारनेर विधानसभा मतदारसंघ हा निलेश लंकेंचा बालेकिल्ला. अजित पवारांमुळे निलेश लंके राष्ट्रवादीत आले आणि तेथून निवडून आले. परंतु लोकसभेसाठी ते अजितदादांची साथ सोडून शरद पवारांकडे गेले आणि लोकसभा निवडणुकीचे उमेदवार झाले, त्यासाठी निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिला.
त्यामुळे अजित पवार पारनेरमध्ये येऊन निलेश लंकेंच्या विरोधात काय बोलतात, याकडे लक्ष लागले. अजित पवारांनी दादा स्टाईल भाषणातून निलेश लंकेंना पुरता धो-डाला. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीचा पारा पारनेरमध्ये चांगलाच तापला आहे.
अजितदादांनी सभेतून फटकारल्यानंतर निलेश लंकेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘दादांना विचारणार आहे. फोन करणार आहे. दोन दिवसांत मतदान होईल. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधणार आहे. दादा सभेत कसे बोलले ते पाहा. काहींनी खालून चिठ्ठ्या दिल्या होत्या. त्यानंतर दादा बोलले. शेवटी एखाद्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्यावर त्यावेळेस उमेदवाराच्या बाजूने बोलणेच अपेक्षित असते’, असे निलेश लंकेंनी म्हटले आहे.
निलेश लंकेंनी निवडणुकीच्या ४५ दिवसांच्या प्रचारावर भाष्य केले. निवडणुकीच्या निमित्ताने ४५ दिवसांच्या प्रचारात बहुतांशी गावांत गेलो. मी अनेक निवडणुका पहिल्या. उमेदवार म्हणून जनतेत जातो, त्यावेळी जनतेची अपेक्षा असते की, उमेदवार आपला असला पाहिजे. आपली कामे त्याने केली पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी उमेदवार म्हणून उत्स्फूर्त स्वागत झाले. एकंदरच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, असे चित्र पाहायला मिळाल्याचे निलेश लंकेंनी सांगितले.