रात्री पार्ट्या, चूक झाल्यास विजेचे शॉक अन्… ,आश्रमातील मुलांच्या खुलाशाने उडाली खळबळ..

उल्हासनगर : एका अनधिकृत बालक आश्रमात मुलांचा अमानुष छळ होत असल्याचा आणि निष्काळजीपणामुळे एका बालकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उल्हासनगर जवळील खंडाळी येथून समोर आला आहे.
या प्रकरणी आश्रमाच्या संचालिका शोभा कुर्के यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्रमातून सुटका करण्यात आलेल्या मुलांनी बालकल्याण समितीसमोर आपली आपबीती कथन केली आहे
मुलांच्या म्हणण्यानुसार, आश्रमात चूक झाल्यास त्यांना विजेचे शॉक दिले जायचे आणि जबर मारहाण केली जायची. रात्रीच्या वेळी आश्रमात पार्ट्या चालत आणि मुलांना दारू वाढण्यास भाग पाडले जात असे.
आश्रमाची पाहणी केली असता तेथील धक्कादायक परिस्थिती समोर आली. आश्रमातील एकूण २० मुलांपैकी चार मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. संचालिका शोभा कुर्के या गेल्या १६ वर्षांपासून हा आश्रम चालवत होत्या आणि शासकीय मदतही मिळवत होत्या, असे समोर आले आहे.
दरम्यान, आश्रमातील एका बालकाचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यानंतर हे गंभीर प्रकरण उजेडात आले. यानंतर प्रशासनाने कारवाई करत संचालिका शोभा कुर्के यांच्यासह पाच जणांवर गुन्हा नोंदवला आहे. आश्रमातील मुलांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.