समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी बातमी! ‘या’ तारखेदरम्यान वाहतुकीत होणार मोठे बदल, जाणून घ्या..

पुणे : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत गॅन्ट्री उभारणीचे काम हाती घेण्यात आले असून, त्यामुळे ठराविक कालावधीत वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

तसेच प्रशासनाने नागरिकांना प्रवासापूर्वी योग्य नियोजन करण्याचं आवाहन केलं आहे. हे काम २७ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि कार्यक्षम करण्याचा उद्देश आहे.
त्यामुळे काही वेळांसाठी महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवली जाणार आहे. समृद्धी महामार्गावरील किमी ९०+५०० ते किमी १७०+४०० या दरम्यान गॅन्ट्री उभारणीचं काम करण्यात येणार आहे. यात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुके तसेच वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) तालुक्याचा समावेश आहे.

MSRDC च्या माहितीनुसार, हे काम एकूण १२ टप्प्यांमध्ये होणार असून, प्रत्येक टप्प्यात एका बाजूची वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई किंवा नागपूर दिशेकडील वाहतुकीवर तात्पुरता परिणाम होणार असल्याने प्रवाशांनी वेळेची योग्य आखणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, या कामामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील पठाणपूर, चांदूर रेल्वे तालुक्यातील धोत्रा व खंबाळा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलू नटवा, पाचोड व वाढोना रामनाथ तसेच कारंजा (लाड) तालुक्यातील निंबा जहागीर व धानोरा ताथोड या भागांमध्ये वाहतुकीवर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता आहे.
