महायुतीत फडणवीस अन् शिंदेंच्या खात्यांमध्ये नेमणुकीवरून नवं युद्ध ; पद एकच आदेश मात्र दोन….

पुणे : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजप ,शिवसेना (शिंदे गट )आणि राष्ट्रवादी(अजित पवार गट) या तिन्ही पक्षात सातत्याने मतभेद आणि कुरघोडी असल्याचे दिसून येत आहे. नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून तीन पक्षात असलेला वाद अद्याप मिटलेला नसतानाच आता बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक पदावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे एकाच पदावर दोन व्यक्तींची निवड करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.
गेल्या काही दिवसापासून बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापकपद रिक्त आहे. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून या पदावर आशिष शर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचे पत्र दिले आहे तर दुसरीकडे याच पदावर एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून आश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचे म्हटले आहे. एकाच पदावर दोन व्यक्तींची निवड करण्यात आल्याने संभ्रम वाढला आहे.त्यामुळे आता दोघांपैकी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान एकाच दिवशी दोन अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याने कोणाच्या आदेशाचे पालन करायचे असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात अधिकाऱ्यांवरून संघर्ष असल्याचे समोर येत आहे.