पुण्यातील नवले पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियम लागू, जाणून घ्या महत्वाची संपूर्ण माहिती…


पुणे : पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा मृत्यूचा भीषण सापळा उभा राहिल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून मोठ्या प्रमाणावर बदल केले जात आहेत. नुकत्याच झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू आणि दहा जण जखमी झाल्यानंतर हा पूल पुन्हा चर्चेत आला आहे.

अनेक वर्षांपासून या ठिकाणी वारंवार अपघात होत असून हा उतार अपघातप्रवण म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळाची पाहणी करून तातडीची बैठक घेतली आणि महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.

नवले ब्रिज परिसरातील वाढत्या वाहन गर्दी, अवजड वाहनांची अनियमित धावपळ आणि वेगमर्यादांचे उल्लंघन यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.

यावेळी स्पीड नियंत्रणासाठी नवे नियम, अवजड वाहनांवरील तपासणी आणि दंड वसुली प्रक्रियेत तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढच्या काही दिवसांत या उपाययोजना प्रत्यक्षात राबविल्या जाणार आहेत.

नवीन आदेशानुसार नवले पूल परिसरातील वाहनांच्या वेगमर्यादेत मोठा बदल करण्यात आला असून पूर्वी 60 किलोमीटर प्रतितास असलेली मर्यादा आता थेट 30 किमी प्रतितास करण्यात आली आहे. वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी याठिकाणी आधी असलेली तीन स्पीडगन्सची संख्या वाढवून सहा करण्यात येणार आहे. स्पीडगन्सच्या मदतीने वेगमर्यादा मोडणाऱ्या वाहनांवर लगेच कारवाई केली जाईल.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की वेगमर्यादा मोडणाऱ्या वाहनांना पुढच्या टोलनाक्यावर थांबवून तात्काळ दंड वसूल केला जाईल. यामुळे नियम मोडणाऱ्यांवर तत्काळ नियंत्रण ठेवणे शक्य होणार असून अपघातांची संख्या कमी होण्याची अपेक्षा आहे. याचबरोबर नवले ब्रिज परिसरात अतिरिक्त दिशादर्शक फलक लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

मुरलीधर मोहोळ यांनी बैठकीत अवजड वाहनांबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खेड–शिवापूर टोलनाक्यावर आता अवजड वाहनांचा लोड तपासला जाईल. वाहनातील वजन परवानगीपेक्षा जास्त आढळल्यास त्वरित दंड आकारला जाणार असून अतिरिक्त वजन कमी करण्याचेही निर्देश दिले जातील. या तपासणीसाठी स्वतंत्र चेकपोस्ट उभारण्यात येणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!