नव्या वर्षात शेतकऱ्यांसाठी नवीन नियम ; बँकेपासून ते पीएम किसानपर्यंत कोणते बदल?

पुणे : नववर्ष 2026 केवळ नवीन तारीख घेऊन आलेले नाही तर सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे नियम घेऊन आले आहे.नवीन वर्ष सुरू होताच केंद्र सरकार आणि बँकिंग व्यवस्थेशी संबंधित काही महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत. याचा थेट परिणाम शेतकरी वर्गावर होणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही, त्यांचे पॅन कार्ड 1 जानेवारीपासून निष्क्रिय झाले आहे. पॅन निष्क्रिय झाल्यास बँकेत नवीन खाते उघडता येणार नाही, मोठे आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत आणि आयटी रिटर्न भरणेही अशक्य होईल. अनेक शेतकरी आता शेतीसाठी कर्ज, अनुदान किंवा शासकीय योजनांचा लाभ घेतात. त्यामुळे आधार-पॅन लिंक करणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. मात्र आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘डिजिटल फार्मर आयडी’ अनिवार्य करण्यात येत आहे. हा आयडी नसेल तर पुढील हप्ता थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे आता डिजिटल फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे

एसबीआय, एचडीएफसी, पीएनबी यांसारख्या मोठ्या बँका मुदत ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरात बदल करण्याची शक्यता आहे. याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या पीक कर्ज, ट्रॅक्टर कर्ज आणि गृहकर्जावर होऊ शकतो. व्याजदर वाढल्यास कर्जाचा हप्ता वाढेल, तर एफडीवरील व्याजदर बदलल्यास शेतकऱ्यांच्या बचतीवर परिणाम होणार आहे.
