हडपसर ते यवत उन्नत मार्गात पायाभूत समितीच्या बैठकीत नव्याने सुधारणा! उन्नत मार्गातील उड्डाणपूल भैरोबानाला ते यवत रचनेला मान्यता; सर्व लोकप्रतिनींधीची मागणी मुख्यमंत्र्यांनी घेतली विचारात…

जयदिप जाधव
उरुळीकांचन : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच 65) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात येणारा उड्डाणपूल भैरोबा नाला ते यवत असा उभारण्यास राज्य सरकारच्या पायाभूत समितीने मंगळवारी मान्यता दिली आहे. या समितीचे अध्यक्ष या नात्याने दौंडचे आमदार राहुल कुल यांनी नव्याने या महामार्गाची एकूण लांबी भैरोबानाला ते यवतपर्यंत करण्यात पुन्हा एकदा यश मिळविले आहे. त्यामुळे आता भैरोबानाला-हडपसर ते यवत असा सहापदरी उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग असून हडपसर ते यवतपर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. या दरम्यान प्रवासासाठी नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्ग सातत्याने कोंडला जात असल्याने नागरीकांचा मनस्तापाचा कडेलोट झाला आहे. महामार्ग विस्तारीकरण करुन उन्नत मार्गाद्वारे या मार्गावर उड्डाणपूल उभा करुन प्रशस्त मार्ग करण्याची मागणी हवेली व दौंड तालुक्यातून होत आहे.

गेली अनेक वर्षे या प्रश्न भिजत पडल्याने दौंड चे आमदार राहुल कुल , शिरूर- हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी या मार्गांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मध्यंतरी पुणे शहरातील आ. चेतन तुपे व योगेश टिळेकर यांनी हा मार्ग भैरोबानाला येथून सुरू करुन पुण्यातील वाहतुक ही थेट शहराबाहेर काढण्यासाठी उपायोजना करा अशी मागणी लक्षवेधी सूचनांमधून उपस्थित केली होती. त्यानंतर या महामार्गाची लांबी भैरोबानाला ते बोरीभकड पर्यंतच करण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न होता. मात्र दौंड चे आमदार राहुल कुल यांनी या संदर्भात पाठपुरावा सुरू ठेवल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन हा महामार्गावर थेट यवतपर्यंत ३९ किलोमीटर अंतरावर उड्डाणपूल करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत समितीची बैठक झाली. त्यामध्ये सोलापूर रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी हडपसरऐवजी भैरोबानाला येथून उड्डाणपुलाचे काम सुरू करावे, यावर चर्चा करून त्यास मान्यता दिली. त्यामुळे नव्याने या पुलाची लांबी ८ किलोमीटर इतकी वाढणार आहे. दरम्यान ‘एमएस आरडीसी’च्या आश्वासक समितीच्या अंतर्गत हा मार्ग विकसित होणार आहे.
महत्त्वाचे
– ३९ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल होणार
– प्रकल्पासाठी पाच हजार २६२ कोटींच्या खर्चास राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे
– प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत बीओटी तत्त्वावर केले जाणार
– काम पूर्ण झाल्यावर सर्व वाहनांसाठी टोल आकारण्यात येणार
– निविदा काढून हे काम दिल्यानंतर संबंधित ठेकेदार कंपनीला कामाचा आदेश दिल्यानंतर तीन वर्षांच्या कालावधीत हे काम पूर्ण करणे बंधनकारक
– या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे
