निवडणूक आयोगाकडून प्रत्येक निवडणुकीत नवीन खेळ? कोणत्याही परिस्थितीत VV-PAT मशीनसहच निवडणूक घ्यावी लागेल!

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्वाची बातमी काल समोर आली. या निवडणुका एकत्र होणार नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. तसेत या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार नाही, असे संकेत राज्य निवडणूक आयुक्तांनी दिल्याची माहिती आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्व निवडणुका एकत्रित घेण्यासाठी मनुष्यबळ राज्य निवडणूक आयोगाकडे नाही. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील. पहिली कोणती निवडणूक घेतली जाईल ते अजून निश्चित नाही. याबाबत माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. असे असताना याबाबत आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार म्हणाले, निवडणूक आयोगाकडून प्रत्येक निवडणुकीत नवीन खेळ केला जातो, कधी नावं वगळली जातात, कधी नवीन नावं ॲड केली जातात तर कधी याद्यांचा घोळ घातला जातो. याबाबत आक्षेप घेतला की त्यावर उत्तरही दिलं जात नाही. पुढच्या निवडणुकीच्या वेळी मात्र मागील आक्षेपाचे मुद्दे बाजूला ठेवून नवीन डाव टाकला जातो.
तसाच आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT मशीन रद्द करण्याचा निर्णय घेतला का? हा निर्णय कुणाला जिंकवण्यासाठी तर घेतला नाही ना? निवडणूक आयोगाने निःपक्षपाती राहणं अपेक्षित असताना आयोगावर होणारा पक्षपातीपणाचा आरोप आयोग स्वतःच्याच कृतीतून वेळोवेळी का सिद्ध करतंय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच सध्या निवडणुकीचा खेळ ज्या पद्धतीने सुरु आहे ते पाहून भीती वाटते की, उद्या केवळ सत्ताधारी पक्षाचंच चिन्ह EVM येऊन केवळ यांनाच निवडून द्या, असा तर आदेश निघणार नाही ना? कोणत्याही परिस्थितीत VVPAT मशीनसहच निवडणूक घ्यावी लागेल. असा इशारा देखिलअँडर रोहित पवार यांनी दिला आहे.