पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! २७ किमीचा नवा मेट्रो मार्ग लवकरच सेवेत; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा..

पुणे : पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाचा विस्तार वेगाने सुरू असून, येत्या दोन वर्षांच्या कालावधीत शहराला आणखी एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे.

तसेच या नव्या मेट्रो मार्गाची एकूण लांबी तब्बल २७ किलोमीटर इतकी असणार असून, यामुळे पुणे शहरातील प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोबाबत ही महत्त्वाची माहिती दिली आहे.
पुण्यातील वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न लक्षात घेता मेट्रो प्रकल्प शहरासाठी अत्यंत आवश्यक ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मेट्रोच्या विस्तारामुळे पुणेकरांचा दैनंदिन प्रवास मोठ्या प्रमाणात सुलभ होणार आहे.

ही महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. विधानसभेत राज्यातील विविध पायाभूत प्रकल्पांबाबत माहिती देताना त्यांनी पुणे मेट्रोच्या प्रगतीचा सविस्तर आढावा मांडला. सध्या पुण्यात 33 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग पूर्ण झाला असून, या मार्गावरून दररोज सरासरी 2.23 लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
पुणे शहरात सध्या एकूण 45 किलोमीटर लांबीच्या अतिरिक्त मेट्रो मार्गांचे काम विविध टप्प्यांत सुरू आहे. यापैकी 27 किलोमीटरचा टप्पा पुढील दोन वर्षांत पूर्ण करून तो प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि नागपूरमधील मेट्रो प्रकल्पांचीही माहिती दिली. मुंबईत आतापर्यंत 91 किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे कार्यान्वित झाले असून, दररोज सुमारे 9.5 लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. मुंबई महानगर प्रदेशात सध्या 170.40 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गांचे काम सुरू असून, यापैकी पुढील दोन वर्षांत 132 किलोमीटर मार्ग कार्यान्वित करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे.
नागपूर शहरातही मेट्रो प्रकल्प वेगाने प्रगतीपथावर असून, आतापर्यंत 40 किलोमीटर मेट्रो मार्ग पूर्ण झाला आहे. या मार्गावरून दररोज सुमारे 1.1 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. नागपूरमध्ये आणखी 43 किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम सुरू असून, तेही लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.