NEET-PG परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार, सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय..

पुणे : नीट पीजी २०२५ परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं आहे की, परीक्षा एकाच सत्रात घेण्यात यावी, जेणेकरून पारदर्शकता टिकेल आणि सर्व उमेदवारांना समान संधी उपलब्ध होईल.
तसेच नीट पीजी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, त्या सुनावणीदरम्यान कोर्टाने ती मागणी फेटाळून लावत एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. या निर्णयानंतर नीट पीजी २०२५ ची परीक्षा १५ जून रोजी देशभरात एकाच सत्रात पार पडणार आहे.
परीक्षेचे दोन सत्र घेतल्यास प्रश्नांच्या कठीणतेत फरक निर्माण होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असमानता निर्माण होऊ शकते, असं स्पष्ट करत कोर्टाने दोन सत्रांत परीक्षा घेण्याची याचिका फेटाळली आहे.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास प्रश्नपत्रिकांच्या कठीणतेच्या स्तरात भिन्नता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे असमानता आणि मनमानीची शक्यता वाढते, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.
कोणत्याही दोन प्रश्नपत्रिका अचूकपणे एकसमान कठीणतेच्या असतील, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांसाठी समान निकष आणि संधी सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा एकाच सत्रात घेणे आवश्यक आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, १५ जून रोजी होणाऱ्या NEET-PG २०२५ परीक्षेसाठी आवश्यक तयारी करण्यासाठी अजूनही वेळ उपलब्ध आहे, असे स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. परीक्षेसाठी केंद्र निश्चित करण्यासाठी परीक्षा मंडळाकडे पुरेसा वेळ आहे, असेही कोर्टाने नमूद केले. त्यामुळे परीक्षा दोन सत्रांमध्ये होण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.