NEET Exam : गोंधळामुळे नीट ची परीक्षा पुन्हा होणार? नेमकं काय आहे प्रकार, पालकांसह विद्यार्थ्यांचा संताप…
NEET Exam : जगभरातील सर्वात मोठी परीक्षा आणि एमपीएससी यूपीएससी पेक्षाही आत्ता जास्त महत्त्व आलेल्या परीक्षेमध्ये पेपर फुटी प्रकरण, ग्रेसमार्क प्रकरण, पहिल्यांदाच ६७विद्यार्थ्यांना ७२० मार्क, आठ विद्यार्थी एकाच केंद्रावरील टॉपर यामुळे हे प्रकरण जास्त गाजू नये म्हणून देशाचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहे.
असे असताना, नियोजित निकालाची १४ जून तारीख असताना, घाईघाईत अन्सर की जाहीर करून दुसऱ्याच दिवशी ४ जून रोजी सायंकाळी चार वाजता निकाल लावला. आता मात्र देशभरात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विरोधात प्रचंड असंतोष उफाळला आहे.
प्रथमच देण्यात आलेली ४१८ किंवा ४१९ गुण मिळतातच कसे याबाबत आवाज उठवल्यानंतर दिलेले ग्रेसमार्कचे कारण तसेच मागील आठ वर्ष निकालानंतरच्या जाहीर करण्यात येणाऱ्या प्रेस नोट मध्ये देशपातळीवरील व राज्यस्तरीय टॉपर विद्यार्थ्यांचे मार्क्स देत होते. यंदा ग्रेस मार्क प्रकरण झाकण्यासाठी यंदा मार्कच न देता फक्त परसेंटाइल दिले.
तसेच राज्यातील विद्यार्थी मित्रहो, गोंधळून जाऊ नका. मागील वर्षीच्या तुलनेत देशभरात परीक्षार्थी विद्यार्थ्यांची सुमारे तीन लाख वाढ झाली असली तरी महाराष्ट्रात मात्र फक्त १६३८ विद्यार्थ्यांची वाढ झाली असून देशभरात ५६.४१% विद्यार्थी पात्र असले तरी राज्यातील पात्र विद्यार्थ्यांची टक्केवारी मात्र 51.75 टक्के आहे ही जमेची बाजू आहे.
यंदा कट ऑफ मार्क्स हे वाढणारच आहेत, परंतु राज्यातील कोणताही प्रवेश हा ऑल इंडिया रँक वर नसून प्रवेशासाठी राज्यातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून नाव नोंदणी केल्यानंतर त्यांना देण्यात येणाऱ्या राज्यातील मेरिट क्रमांकावर अवलंबून असतो. यंदा राज्यातून प्रवेशासाठी सुमारे 65 ते 70 हजार विद्यार्थी नाव नोंदणी करतील. त्यानंतर आपणास राज्यातील मेरिट क्रमांक मिळेल. NEET Exam
यंदा सुमारे खुल्या गटासाठी एमबीबीएस शासकीय ३४०० तर खाजगी ८००० पर्यंत तसेच बीएएमएस शासकीय साठी सुमारे ११ हजार तर खाजगी प्रवेश २२ हजार मेरिट क्रमांक पर्यंत प्रवेश मिळू शकेल असा अंदाज आहे.
अर्थातच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश किती रिपीटर विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत भाग त्यावर अवलंबून असतो थोडक्यात आपल्याला शासकीय एमबीबीएस प्रवेश मिळत नसेल तर प्लॅन बी म्हणून इतर कोर्सचा शासकीय खाजगी तसेच अभिमत विद्यापीठांमधील प्रवेशाचा सुद्धा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
राज्यामध्ये यंदाचे वर्षी नव्याने शासकीय एमबीबीएस महाविद्यालय जालना, भंडारा, गडचिरोली, वासिम, नाशिक, अमरावती, बुलढाणा, हिंगोली अंबरनाथ (ठाणे) व मुंबई अशी १०० प्रवेशक्षमता असलेली दहा तसेच औरंगाबाद पालघर आणि मूर्तिजापूर या ठिकाणी नविन तीन खाजगी महाविद्यालय GOI-भारत सरकार NMC नॅशनल मेडिकल कमिशन, MUHS-आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आणि महाराष्ट्र सरकार यांचेकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत ही जमेची बाजू आहे .
नीट परीक्षा पुन्हा होणार का?
नीट प्रकरण आता वाढत चालल्यामुळे निर्णय घेण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमल्याचे एन टी ए बोर्डातर्फे प्रेस कॉन्फरन्स द्वारे जाहीर केलेले आहे. मुळातच हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून ज्या ठिकाणी गोंधळ झाला, पेपर फुटी झाली, पंधराशे विद्यार्थ्यांना ग्रेस मार्ग दिले अशा सर्वांसाठी कोर्टाच्या आदेशाची वाट न पाहता बोर्डाने त्वरित नव्याने परीक्षा घेऊन अंतिम निकाल जाहीर करून पुन्हा लवकर प्रवेश प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित आहे.
मागील वर्षी मनिपुर प्रकरण तसेच त्यापूर्वी देशातील पूरग्रस्त परिस्थिती मुळे अनेक केंद्रावर नीट परीक्षा स्वतंत्रपणे त्वरित घेतली गेली होतीच ठराविक केंद्रावर परीक्षा घेण्याची प्रॅक्टिस एन टी ए बोर्डाला आहेच.
सर्वांसाठी परीक्षा घेणे शक्य नाही. पुन्हा अभ्यास करावा लागेल, म्हणून पुन्हा मोठा कालावधी द्यावा लागेल याला अनेक पालकांकडून विरोध होईल आणि जर या सर्व गोष्टीला मोठा कालावधी गेला तर चालू शैक्षणिक वाया जाऊ शकते याची एनटीए कडून गांभीर्याने नोंद घेणे आवश्यक आहे.