हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे युवराज काकडे बिनविरोध; तर उपसभापती विद्या दत्तात्रय गायकवाड यांची निवड….


उरुळीकांचन : पुणे जिल्ह्यात प्रतिष्ठेची मानली जाणारी हवेली पंचायत समिती अखेर राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली असून सभापतीपदी युवराज हिरामण काकडे तर उपसभापतीपदी अपक्ष सदस्य विद्या दत्तात्रय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडी शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या शिफारशीनुसार करण्यात आल्या आहेत.

हवेली पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया सोमवारी (दि.9) पार पडली. सभापती पदासाठी युवराज काकडे तर उपसभापती पदासाठी अपक्ष सदस्य विद्या गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. निवड जाहीर होताच उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दोघांचे स्वागत केले.

त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाचे जिल्हा समन्वयक सुरेश घुले, हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर , हवेली बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र बडेकर, ‘यशवंत’ चे संचालक संतोष कांचन, ज्येष्ठ नेते बाळासाहेब चौधरी यांच्यासह पं. समिती सदस्य मनोज ऊर्फ कृषीराज चौधरी, कोमल कांबळे, सुषमा मुरकुटे, अमोल टेकाळे, युवराज वांजळे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित सभापती युवराज काकडे म्हणाले की, हवेली तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम केले जाईल. गावागावातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा यावर विशेष भर देत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील. पक्षश्रेष्ठी तसेच तालुक्याचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी जो विश्वास दाखविला तो सार्थ करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!