राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरे -पाटलांची पक्षाने पाठवलेल्या नोटीसीवर प्रतिक्रिया, काय म्हणाल्या ?

पुणे : राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या दोन नेत्यांच्या मधील वादाने चर्चेला चांगलेच तोंड फुटले आहे. चाकणकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर रूपाली पाटील यांना पक्षाने नोटीस पाठवली होती. या नोटीसीवर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मला पक्षाची नोटीस आलेली नाही, मला पक्षाने खुलासापत्र काल रात्री दिलं आहे. मी माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला मागितला आहे. 7 दिवसांचा त्यासाठी वेळ मला दिलेला आहे.तो खुलासा मी देणार आहे असेही रुपाली पाटील – ठोंबरे यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, पक्षातील खुलासा ही एक प्रक्रिया आहे. जे सत्य आहे ते मी सगळं सांगणार आहे. कायदेशीर खुलासा जेव्हा मी पक्षाला करेल तेव्हा तो मी तुम्हाला सुद्धा देणार आहे. माधवी खंडाळकर नावाच्या महिलेने व्हिडीओ व्हायरल केला होता.तिला मारलं असे तिने सांगितले होते, तेव्हा मी बीडमध्ये होते असे रुपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हटले आहे. माधवी खंडाळकर यांच्या व्हिडीओचा वाद त्यावेळी पोलिस स्टेशनमध्ये गेला. तो वाद संपवण्यात आला होता. त्यानंतर सीपीला त्या माधवी खंडाळकर हीने तक्रार दिली. त्याच्या अर्ध्या तासात गुन्हा घेतला गेला. माधवी खंडाळकर आणि तिच्या भावावर 354 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.खंडाळकर यांचा गुन्हा कुणाच्या सांगण्यावरुन दाखल करण्यात आला याचा तपास करावा असं रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान त्यांनी पुढे असं म्हटलं की, दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. दादांना सांगितलं लहानपणापासून आम्ही मैत्रिणी आहोत हे ऐकून दादा शॉक झाले. दादा म्हणाले ज्यांची चूक आहे त्याची पोलीस तपासातून माहिती मागून घेणार आहेत. यावेळी पक्षाचा राजीनामा देणार का ? असे विचारले असता मी काय पळून जाणारी महिला वाटते काय तुम्हाला? कायद्याने उत्तर देणार आहे असे उत्तर रुपाली पाटील-ठोबरे यांनी दिले.

