राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला रुपाली चाकणकरांवर टीका करणं भोवलं ; पक्षाकडून नोटीस, 7 दिवसाची मुदत नाहीतर….


पुणे : राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याविरोधात पक्षातीलच महिला नेत्या रूपाली पाटील यांनी जोरदार टीका केली होती. आता चाकणकर यांच्यावर टीका करणे त्यांना चांगलंच भोवलं आहे. याप्रकरणी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मोठी पावलं उचलले आहेत,पक्षाने रूपाली पाटील यांना नोटीस पाठवून शिस्तभंगाच्या कारवाईबाबत खुलासा मागितला आहे. त्यासाठी त्यांना सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

नुकतीच फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्या प्रकरणावरून रूपाली चाकणकर आणि रूपाली ठोंबरे पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार खटके उडाले होते. रूपाली चाकणकर यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे चारित्र्यहनन केले असा आरोप करत रूपाली पाटील यांनी चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर पुण्यामध्ये रूपाली चाकणकर यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये सुद्धा रूपाली पाटील सहभागी झाले होत्या. या आंदोलनामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या सुद्धा सहभागी होत्या. या नेत्यांसोबत आंदोलनात सहभागी होऊन चाकणकर यांचा राजीनामा रूपाली पाटील यांनी मागितला होता. काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर नामक महिलेने रूपाली पाटील यांच्या कुटुंबियांवर मारहाणीचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा सुद्धा रूपाली चाकणकर यांच्या सांगण्यानुसारच दाखल करायला लावला असल्याचा आरोप रूपाली पाटील यांनी केला होता आणि आता चाकणकर यांची थेट माझ्याशी गाठ असल्याचा इशारा त्यावेळेस रूपाली पाटील यांनी दिला होता. यावरून त्यांच्यातील वाद वाढतच गेला. या प्रकरणाची आता थेट पक्ष स्तरावर दखल घेतली आहे.

याप्रकरणी संघटक सरचिटणीस संजय खोडके यांनी रूपाली पाटील-ठोंबरे यांना ही नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली असताना आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष व पक्षाच्या महिलाध्यक्षा यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये केलेले वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे. म्हणून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा प्रदेश कार्यालयाकडे 7 दिवसांच्या आत करावा अन्यथा आपल्या विरुद्ध योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असं नमूद करण्यात आले आहे. तसेच या नोटिशीची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!