आजपासून नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभमुहूर्त…

पुणे : अखेर आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. देशभरात देवीचं आगमन अगदी जल्लोषात करण्यात येतंय. दरवर्षी येणारा शारदीय नवरात्र उत्सव हा देवी दुर्गेची भक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहे.

शक्ती उपासनेच्या या भव्य उत्सवादरम्यान, देवीच्या विविध 9 रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते. सार्वजनिक मंडळ तसेच घरोघरी देवीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जाते आणि भक्त मोठ्या उत्साहाने उपवास आणि पूजा करतात.

आज पासून शारदीय नवरात्र महोत्सव सुरू होतोय. आज म्हणजे सोमवारी 22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 11:49 ते दुपारी 12:38 पर्यंत आहे.

नवरात्री घटस्थापनेसाठी मातीचे लहान मडके किंवा कलश विविध प्रकारचे धान्य लहान टोपली, माती, कापूर, रांगोळी, वेलची, लवंग, सुपारी, अक्षतांसाठी तांदूळ, आंब्याची डाहाळी, आंब्याची पाने, पैशाची नाणी, पान सुपारी, शेंदूर, नारळ, फळे, फुले, श्रुंगार पेटी, फुलांचे हार इत्यादी साहीत्य असावे.
तुळजापूरच्या आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव यापूर्वीच सुरू झाला आहे. घटस्थापनेच्या निमित्ताने वेगवेगळी तरुण मंडळ तुळजापूर, कोल्हापूर, वणी, कार्ला येथून ज्योत आणतात. पण त्याच बरोबरीने घरोघरी घटस्थापना केली जाते. ही घटस्थापना प्रत्येक कुटुंब यथासांग पद्धतीने करत असते. त्याची घटस्थापना कशी असावी यासंदर्भात थोडक्यात केलेले मार्गदर्शन.
चौरंगावर नवीन लाल वस्त्र अंथरावे. त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावे. मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्याच्यावर तांब्याच्या कलश ठेवावा कलशात एक नाणे टाकून त्याच्यावर विड्याच्या पानांमध्ये नारळ ठेवावा. कलशाला हळद कुंकू लावावे. त्यानंतर घटस्थापनेसाठी परडीत माती घ्यावी. मातीत सात प्रकारची धान्य पेरावे. त्यावर मातीचा कलश ठेवावा. कलशात पाणी घालावे.
त्यात नाणे टाकावे आणी तांदूळ घालावे. त्यावर विड्याची पाने लावून त्यात नारळ ठेवावा. नारळाला हळदी कुंकू लावावे. कलशाला लाल धागा बांधावा. लाल धाग्याला विड्याची पाने 9 लावून माळ तयार करावी व ती पहील्या दिवशी बांधावी. हा घट देवीसमोर बसवावा. त्यानंतर देवीला हार फूले अर्पण करून धूप, दिप, अगरबत्ती लावून पूजा करावी. शेवटी देवीची आरती करावी. देवीची सकाळी संध्याकाळी पूजा करावी.
