नवी मुंबई हादरली : नवविवाहितेचा हुंड्यासाठी पती, सासू-सासऱ्यांकडून अमानुष छळ, उचललं टोकाच पाऊल

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात सासरच्याकडून विवाहितेच्या होणाऱ्या छळाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच आता नवी मुंबईतील तळोजा परिसरातील नावडे येथे एका विवाहितेने सासरकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, वैशाली विनायक पवार असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. वैशालीने २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.मयत वैशालीचा विवाह १० मे २०२३ रोजी उमेश रमेश पवार याच्याशी झाला होता. लग्नाच्या वेळी वैशालीच्या माहेरच्यांनी सुमारे अडीच लाख रुपये आणि सोन्याचे दागिने दिले होते. इतके देऊनही वैशालीच्या सासरच्या मंडळींचा हावरटपणा थांबला नाही. लग्नानंतर काही दिवसांतच त्यांनी वैशालीकडे नवीन कार घेण्यासाठी माहेरहून आणखी १ लाख रुपये आणावेत, अशी मागणी सुरू केली.ही मागणी पूर्ण न झाल्याने पती उमेश पवार, सासू अरुणा पवार, सासरा रमेश पवार यांच्यासह नणंद सोनू राठोड, नेहा राठोड आणि मेव्हणा कृष्णा राठोड यांनी वैशालीचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.

दरम्यान विवाहितेचा सततचा अपमान, जाच आणि छळ यामुळे वैशाली पूर्णपणे मानसिकदृष्ट्या खचली होती. सासरच्या लोकांकडून होणारा हा अमानुष छळ असह्य झाल्यामुळे अखेर मंगळवारी सकाळी वैशालीने टोकाचे पाऊल उचलले.या धक्कादायक घटनेनंतर वैशालीच्या वडिलांनी तात्काळ तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वैशालीचा पती उमेश पवार, सासरा रमेश पवार आणि सासू अरुणा पवार या तिघांना अटक केली आहे.

याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध तळोजा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ८०(२) आणि हुंडाबळी प्रतिबंधक कायदा कलम ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. लग्नानंतर अवघ्या दोनच वर्षात नवविवाहितेनं अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
