नाशिक हादरलं! ‘भावपूर्ण श्रद्धांजली’चं स्टेट्स ठेवला अन् चौघांनी आयुष्य संपवलं

नाशिक : गेल्या काही दिवसात राज्यातून आत्महत्या घटना वारंवार उघडकीस येत असतानाच नाशिक मधील देवळा तालुक्यातील फुलेमाळवाडी येथे युवकाने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ स्टेटस ठेवून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने ठेवलेला व्हाट्सअपचा स्टेटस पाहून नातेवाईकांना घटना कळली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, गोविंदा बाळकृष्ण शेवाळे (वर्षे ४०) या युवकाने पत्नी आणि दोन लहान मुले यांना संपवून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना आज (दि ३० नोव्हेंबर) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.गोविंदा शेवाळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी सकाळी व्हॉट्स ॲपवर ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असे स्टेट्स टाकले होते. हे स्टेट्स शेवाळे यांच्या लहान भावाने पाहिले आणि त्याला काहीतरी अनुचित घडल्याची शंका आली. त्याने तात्काळ इतर नातेवाईकांना फोनद्वारे याची माहिती दिली. त्यानंतर शेवाळे कुटुंबीयांच्या निवासस्थानी गेल्यावर त्याने आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं.
दरम्यान घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याने पोलिसांनी जमावाला नियंत्रित केले. हत्या की आत्महत्या याबाबतच्या कारणांचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम तपासणी करणार आहे.


दरम्यान स्वतःच्या मृत्यूचे संकेत देणारा ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ हा स्टेटस पाहिल्यानंतर, ही घटना पूर्वनियोजित असावी अशी शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासात व्यक्त केली आहे. या दुर्दैवी घटनेत कोमल गोविंद शेवाळे (वर्षे ३५), ख़ुशी गोविंद शेवाळे (वर्षे ८), श्याम गोविंद शेवाळे (दीड वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे.
यात युवक गोविंद शेवाळे याने स्वतः दोरीने फाशी घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून येत आहे, तर पत्नी, एक मुलगी, एक मुलगा यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले आहे. देवळा पोलीस पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्यासह पोलीस घटनास्थळी उपस्थित असून अधिक तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम उपस्थित होत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
