पुणे रेल्वे स्टेशनला ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव द्या, भाजप खासदार मेधा कुलकर्णींची मागणी..

पुणे : भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या नावात बदल करून ‘थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्याची जोरदार मागणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
त्तर प्रदेशातील अलाहाबादचं नाव प्रयागराजचं करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही दोन शहरांची नावे बदलली आहेत. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्यात आलं आहे.
त्यासोबतच, आता अहमदनगरचं नाव अहिल्यानगर झालं आहे. त्यामुळे, जनभावनांचा आदर करत हे नामांतर करण्यात आल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात आलं. आता, पुणे शहरातील रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे.
पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीला त्या त्या जिल्ह्यातील सर्व खासदार उपस्थित होते. पुणे रेल्वे स्टेशन आणि पुणे शहरासंबंधीत प्रश्न मी या बैठकीत उपस्थित केले. यातील एक मुद्दा होता तो म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, अशा प्रकारची मागणी अनेक संघटनांनी वेळोवेळी केली आहे. आजच्या बैठकीत मी त्याचा पुनरुचार केला आहे.
कुठल्याही रेल्वे स्थानकाचा, विमानतळाचा भारतातील त्याच्या इतिहासाशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरून नागरिकांनाही आपला दैदिप्यमान इतिहास कळाला पाहिजे. परंतु, पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही इतिहास त्यातून प्रतिबिंबित होत नाही. पुणे शहर हे मोठे आहे नावाजलेले आहे
राजधानीच्या शहरापेक्षा कमी नाही. शिक्षणाचे माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे शैक्षणिक शहर आहे, आयटी हब आहे. त्यामुळे इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत म्हणून पुणे रेल्वे स्टेशनला थोरली बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केल्याचे मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.