उद्या नागपंचमी, काय करावं व काय करू नये? जाणून घ्या महत्व आणि नियम…

पुणे : हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो, श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. श्रावण महिन्यात महादेवांची भक्ती भावानं पूजा केली जाते, श्रावण महिन्यात अनेक सण, उत्सव देखील असतात त्यामुळे या महिन्याला उत्सवाचा महिना देखील मानलं जातं.
या महिन्यात येणारा प्रमुख सण म्हणजे नागपंचमी. उद्या म्हणजेच मंगळवारी सर्वत्र उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. यंदा नागपंचमी मंगळवारी, २९ जुलै २०२५ रोजी आहे. हा सण नागदेवतेला समर्पित असतो आणि यानिमित्त घराघरांत पूजन, झोके व्रत भोजनाचे आयोजन केले जाते.
या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या टाळाव्यात हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या दिवशी केलेल्या प्रत्येक कृतीला धार्मिक आणि आरोग्यदृष्ट्याही महत्त्व आहे.
नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शुचिर्भूत होणं आवश्यक आहे. यानंतर शिवजी आणि नागदेवतेचे पूजन करावे. घराजवळील नागमंदिरात जाऊन पूजा करणं किंवा घरातच नागदेवतेची प्रतिमा किंवा चित्र ठेवून पूजन करणं योग्य मानलं जातं. नागदेवतेला दूध, हार, फुले अर्पण करून आशीर्वाद मागावा.
या दिवशी उकडलेले अन्न खाण्याची परंपरा आहे. त्यामागे वैज्ञानिक कारण आहे की पावसाळ्यात पचनशक्ती कमजोर असते, त्यामुळे हलकं व उकडलेलं अन्न आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं. अनेक ठिकाणी या दिवशी विवाहित महिला माहेरी येतात, झोके खेळतात, स्त्रियांचे पारंपरिक गाणी गायले जातात. ग्रामीण भागात अजूनही ही परंपरा उत्साहाने साजरी केली जाते.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिवंत साप पकडून त्याची पूजा करणे पूर्णपणे टाळा. पूर्वी काही भागांत अशी प्रथा होती, पण आता यावर कायदेशीर बंदी आहे. सापांना दूध पाजण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, कारण साप दूध पचवू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो.
दरम्यान, या दिवशी कोणालाही त्रास देऊ नये, विशेषतः प्राणिमात्रांप्रती दयाभाव बाळगावा, असा संदेश या सणात आहे. साप हा निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे त्यांचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे.