दहावीच्या मुलांकडून 5 ते 8 वी च्या मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, रेल्वे कॉटेजजवळच्या झुडपात…, महाराष्ट्रातली धक्कादायक घटनेने खळबळ

नाशिक : वसतिगृहातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाचवी ते आठवी पर्यंतच्या लहान विद्यार्थ्यांवर रॅगिंगच्या नावाखाली अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात घडला आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इगतपुरी पोलिसांनी या प्रकरणी सात विधीसंघर्षित बालकांसह वसतिगृहाच्या अधीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. इगतपुरी तालुक्यातील समाज कल्याण विभागाच्या याच वसतिगृहात खेड्यापाड्यांतील तसेच आदिवासी वस्त्यांवरील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत.
याच वसतिगृहातील दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी पाचवी ते आठवी पर्यंतच्या लहान विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या माध्यमातून धमकावत वसतिगृहापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या रेल्वे कॉटेजजवळील झाडाझुडपांच्या पडीक जंगलात नेऊन त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या ठिकाणी कोणालाही संशय येणार नाही अशा एकांत जागेचा गैरफायदा घेत हा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. लहान विद्यार्थ्यांना धमकावून तसेच नशेची औषधे आणि मद्य देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. पीडित विद्यार्थ्यांनी अनेक वेळा वसतिगृहातील जबाबदार व्यक्तींना या प्रकाराची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यावर दबाव टाकून गप्प बसवण्यात आल्याचा आरोप देखील पुढे आला आहे.
वसतिगृहाचे नुकतेच नियुक्त झालेले अधीक्षक सुशांत दूधसाखरे यांच्याकडे या प्रकाराबाबत तक्रार आल्यानंतर त्यांनी तातडीने विद्यार्थ्यांच्या पालकांना याची माहिती दिली. त्यानंतर संतप्त पालकांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सात विधीसंघर्षित बालकांसह वसतिगृहाच्या अधीक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.