शिर्डीत मध्यरात्री खुनी थरार, साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी संपवलं, घटनेने उडाली खळबळ..
शिर्डी : दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघा जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या साई संस्थानच्याच दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच रात्री तीन जणांवर अशाप्रकारे हल्ला झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
सुभाष घोडे आणि नितीन शेजुळ अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, साई संस्थानचे दोघे कर्मचारी आणि शिर्डीतील एका तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला करण्यात आला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करण्यात आले. यापैकी साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर कृष्णा देहरकर नावाचा तरुण गंभीर जखमी अवस्थेत आहे.
दोघे साई संस्थान कर्मचारी पहाटे ड्युटीला येत असताना या घटना घडल्या. पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना तिघांवर अज्ञातांकडून चाकूने वार करण्यात आले. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर वार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. साई संस्थानच्याच दोघा कर्मचाऱ्यांची एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी हत्या होणं हा योगायोग आहे की यामागे काही कारण आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे.
दरम्यान, शिर्डीत एकाच रात्रीत तिघांवर चाकूने वार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिर्डीत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याची चर्चा होत आहे. पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.