जेजुरीत राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक महेबुब पानसरे यांचा खून, घटनेने उडाली खळबळ
जेजुरी : जेजुरीत महेबुब पानसरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याचा खून झाल्याची घटना घडली आहे. पानसरे हे जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ते खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किरण वनेश परदेशी, वनेश प्रल्हाद परदेशी, स्वामी वनेश परदेशी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
शेतजमिनीच्या जुन्या वादाच्या कारणावरून पानसरे यांचा खून झाला असावा, असा अंदाज आहे. काल सांयकाळी महेबुब पानसरे यांच्यावर चार ते पाच जणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने वार केले.
या घटनेत पानसरे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, शेतात ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत सुरु होती. मेहबूब पानसरे आणि त्यांच्याबरोबर इतर तिघेजण हे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेतातील मशागतीचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी ही घटना घडली.
दरम्यान, वनेश परदेशी यांचे मेहबूब पानसरे यांच्यात जमिनीच्या जुन्या वादाच्या कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. यावेळी वनेश परदेशी त्यांची दोन मुले, इतर पाच जणांनी मेहबूब पानसरे आणि इतर दोघांवर कुऱ्हाड आणि कोयत्याने वार केले, यामुळे ते जखमी झाले.