पुणे हादरलं! शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या १७ वर्षीय युवकाचा खून, तीन दिवसात घडली दुसरी घटना, उडाली खळबळ..

पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

त्यातच, आज पुन्हा एकदा पुण्यात भरदिवसा खुनाचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजीराव रोडवर मयंक खराडे नामक व्यक्तीचा हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे गेल्या ३ दिवसात झालेला हा दुसरा खून आहे. त्यामुळे, शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुण्यात आंदेकर खून प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली असून गेल्या काही महिन्यात अशा घटनांत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दोनच दिवसांपूर्वी पुण्यात गणेश काळे हत्याप्रकरणाने खळबळ उडाली होती.

त्यानंतर, आता १७ वर्षीय मयंक खराडे या युवकाचा खून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजीराव रोडवर खुनाची घटना घडली असून धारदार शस्त्र वापरत आरोपीने खून केल्याची माहिती आहे. या खुनाच्या घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.