थेऊर महिला खून प्रकरणी आणखी दोघांना अटक ; खेड शिवापूर येथून आरोपी ताब्यात …!

पुणे : लघुशंका करताना हटकणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यूप्रकरणी फरार आणखी दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मयुर शंकर जाधव (वय ३२, रा. कुरुळी बांदल वस्ती, ता. खेड), प्रथमेश ऊर्फ सोन्या आनंदा वाहिले (वय २३, रा. केळगाव, चिंबळी, आळंदी रोड, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. थेऊर रोडवरील जय मल्हार हॉटेलजवळ लघुशंका करत असलेल्या ६ ते ७ जणांना तेथील सुरक्षा रक्षक अक्षय चव्हाण यांनी हटकले होते. यावेळी टोळक्यातील अजय मुंढे याने आपल्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. तसेच सुरक्षारक्षक चव्हाण यांच्या पत्नीवर दगडफेक केली. त्यात शीतल अक्षय चव्हाण (वय २९)
यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
लोणीकाळभोर पोलिसांनी या खूनप्रकरणात सतीश बारीकराव लोखंडे, अजय दशरथ मुंढे, भानुदास दत्तात्रय शेलार अशा तीन
आरोपींना अटक केली होती. या गुन्ह्यात मयूर जाधव, प्रथमेश वाहिले हे फरार होते. या दोघा आरोपींची माहिती दरोडा व वाहन चोरी पथकाला मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
दोघांना खेड शिवापूर येथून ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्यांना लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.