महापालिका निवडणुकीत धुरळा ; मनसेचे उमेदवार ठाकरेंच्या ‘मशाल’ वर निवडणुकीच्या रिंगणात?


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आगामी मुंबई महापालिका आणि अन्य महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपांची चर्चा सुरू असताना आता मनसेचे उमेदवार थेट शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावरच निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. मुदत संपण्याच्या अवघ्या काही तास आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथमधील कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश देत अधिकृतपणे निवडणूक लढवण्यास मनाई केली होती. मनसेची अधिकृत उमेदवारी कोणालाही दिली जाणार नाही. इच्छुकांनी अपक्ष म्हणून लढायचे किंवा आपापल्या राजकीय गणितांनुसार निर्णय घ्यायचा, अशी मुभा देण्यात आली होती. त्यानंतर अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या मनसैनिकांनी शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मनसेचे 14 उमेदवार आता मशाल चिन्हावर निवडणूक लढणार असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असे तीन पक्ष एकत्र आले असून अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षाकरिता अंजली राऊत यांना उमेदवारी दिली आहे. अंजली राऊत यांनी आज उमेदवारी दाखल केला आहे. तर, काँग्रेसने या आघाडीतून बाहेर पडत स्वतंत्र पॅनेल, नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहेत. यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!