पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! मुंढवा पासपोर्ट केंद्र बंद; 30 मार्चपासून बाणेर-पाषाण येथे सेवा होणार सुरू…

पुणे : पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयच्या अधिपत्याखालील पासपोर्ट सेवा केंद्र आता मुंढवा येथून स्थलांतरित करण्यात येणार आहे. दि. 30 मार्च 2026 पासून या केंद्रातील सर्व सेवा नव्या ठिकाणी, म्हणजे बाणेर-पाषाण लिंक रोड येथील कार्यालयातून सुरू राहणार आहेत.

सध्या मुंढवा परिसरातील झीरो वन, सर्वे क्रमांक 79/1, घोरपडी-मुंढवा रोड, पिंगळे वस्ती, गंगा ऑर्चिड समोर कार्यरत असलेले पासपोर्ट सेवा केंद्र पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
हे केंद्र आता ‘मॉटक्लेयर बिल्डिंग’, सर्वे क्र. 134/1 (पार्ट), एम.पी.-1 कमर्शियल, पहिला मजला, कार्यालय क्रमांक 101 व 102, बाणेर-पाषाण लिंक रोड, पाषाण, पुणे येथे स्थलांतरित केले जात आहे.पासपोर्ट सेवेसाठी आधीच अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांनी नव्या पत्त्याची नोंद घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच 30 मार्च 2026 किंवा त्यानंतरच्या तारखेसाठी मुंढवा केंद्रात अपॉइंटमेंट असलेल्या सर्व अर्जदारांनी आता थेट नव्या बाणेर-पाषाण केंद्रातच उपस्थित राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या अपॉइंटमेंटची तारीख व वेळ यामध्ये कोणताही बदल न करता फक्त नवीन पत्त्यावर हजर राहणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज प्रक्रिया विलंबित होऊ शकते.
नव्या ठिकाणी स्थलांतरामुळे अर्जदारांना अधिक प्रशस्त जागा, सोयीस्कर पार्किंग आणि सुधारित सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास पासपोर्ट अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बाणेर-पाषाण लिंक रोड हा परिसर हिंजवडी आयटी पार्क, औंध, पाषाण आणि बावधन या भागांशी चांगल्या प्रकारे जोडलेला असल्याने या बदलामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
दरम्यान, पुणेमध्ये पासपोर्ट सेवांसाठी वाढती गर्दी आणि आधुनिक सुविधांची गरज लक्षात घेऊन हे स्थलांतर करण्यात येत असल्याचे समजते. या निर्णयामुळे वाढत्या अर्जांची प्रक्रिया अधिक जलद आणि कार्यक्षम पद्धतीने पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.