मुंबईत खळबळ ; निवृत्त एअरलाईन कर्मचाऱ्यांनं स्वतःच्याच पत्नीला संपवलं, 30 वर्षापासून होते विभक्त..

मुंबई : मुंबईतील पवई भागात एका निवृत्त एअरलाइन कर्मचाऱ्याने त्याच्याच पत्नीची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.हत्या केल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे हे जोडपे 30 वर्षापासून विभक्त राहत होते.या घटनेने परिसरात संतापाचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीचे नाव राजीव चंद्रकांत लाला असे आहे. तर मृत पत्नीची ओळख 54 वर्षीय शालिनी देवी अशी झाली आहे.शनिवारी (27 सप्टेंबर) रात्री राजीव काही कागदपत्रे घेण्यासाठी पवई येथील त्याच्या पत्नीच्या घरी गेला होता. तेव्हाही या दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात राजीवने उशीने शालिनीचं तोंड दाबून त्यांची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.पोलीस तपासादरम्यान असं समोर आलं की, या जोडप्याने 1993 मध्ये लग्न केले होते. परंतु घरगुती वादामुळे 1995 पासून ते वेगवेगळे राहत होते. दरम्यान आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. पण, तो त्याचा मोबाईल फोन आणि कारच्या चाव्या तिथेच सोडून गेला. पोलीस आल्यावर त्यांनी या वस्तू जप्त केल्या आणि तपास सुरू केला.

दरम्यान या दोन पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास केला आणि आरोपी पतीला अटक केली आहे. चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबुल केला. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

