Mumbai Fire : मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीच्या पार्किंगला भीषण आग, ७ जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी..

Mumbai Fire मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरातील जय भवानी या इमारतीमध्ये शुक्रवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून ४० ते ५० जण अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. Mumbai Fire
अग्निशामक दलाने तातडीने मदतकार्य सुरू करत जवळपास ३० जणांना सुखरुप वाचवलं आहे. आगीचे स्वरुप गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. पहाटे अडीच ते पावणेतीनच्या सुमारास ही आग लागली. Mumbai Fire
अग्निशमन दलाला तीन वाजून पाच मिनिटांनी आग लागल्याची वर्दी मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याच्या कार्याला सुरुवात केली.
मात्र, तोपर्यंत आग इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरली होती. यामुळे सात रहिवाशांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
ही एसआरए बिल्डिंग पाच मजली आहे. या इमारतीच्या पार्किंगमध्ये कपड्याच्या चिंध्यांची गाठोडी ठेवली होती. यापैकी काही कापडी चिंध्यांना आग लागली. आग लागल्यानंतर काही क्षणांमध्येच आगीने पार्किंगचा परिसर कवेत घेतला. यामध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या ३० दुचाकी आणि चारचाकी वाहने जळून खाक झाली.
दरम्यान, कापडी चिंध्यांना लागलेल्या आगीमुळे काळा जाड धूर हा इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत जाऊन पोहोचला. खाली आग लागल्याने इमारतीमधील रहिवाशांना खाली येत आले नाही. अखेर अग्निशमन दलाने या सर्वांची सुटका केली. मात्र, तोपर्यंत काळा धूर नाकातोंडात गेल्याने अनेक रहिवाशांची प्रकृती बिघडली.